कोल्हापूर : केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाला शाहू साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सभेत सभासदांचा एकमुखी पाठिंबा

कोल्हापूर : केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीचे धोरण शेतकरी, साखर कारखानदार आणि देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे या धोरणाला शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाहू कारखान्यातर्फे १२ टन प्रतिदिन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा घाटगे यांनी केली. केंद्राच्या इथेनॉल धोरणास सभासदांनी हात उंचावून एकमुखी पाठिंबा दर्शविला.

घाटगे म्हणाले, इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देण्यास मदत झाली आहे. साखर पोत्यावरील व्याजात बचत झाली. साखर उद्योगातील पुढील दहा वर्षांच्या अंदाजानुसार कारखान्याने नियोजन केले आहे. पेट्रोल-डिझेल व गॅससाठी परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राने बायोफ्युएल धोरण स्वीकारले आहे. आता केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेत दररोज १२ टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, बदलत्या परिस्थितीत सर्व साखर कारखान्यांचे गाळप कमी होत आहे; मात्र जितके जास्त गाळप तितकेकारखान्याचे अर्थकारण मजबूत असे दिवंगत राजे नेहमी सांगायचे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी अल्पकालीन फायद्यासाठी उसाची इतर विल्हेवाट न करता संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. विषयपत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजूरच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. ठरावाचे वाचन असि. सेक्रेटरी व्ही. एल. जत्राटे यांनी केले. सभेस ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, वीरेंद्र घाटगे आदी उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here