कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने आगामी ऊस गळीत हंगामासाठी ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ झाली असल्याने वाढीव क्षमतेप्रमाणे तोडणी, वाहतूक यंत्रणाशी करारही पूर्ण केले आहेत. सहवीज निर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरणाची कामे पूर्ण होऊन चाचणी घेतली आहे. आगामी हंगामासाठी आवश्यक कामे पूर्ण होऊन कारखाना गाळपासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन चेअरमन अमल महाडिक यांनी केले.
कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ सालासाठी रोलर पूजन मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक व चेअरमन महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हा. चेअरमन गोविंदा चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी पिकवलेला आपला ऊस कारखान्यास गळतीसाठी पाठवावा, असे आवाहन अमल महाडिक यांनी केले. कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, वसंतदादा ऊस तोडणी वाहतूक संस्था, छत्रपती राजाराम पतसंस्था, राजाराम कारखाना नोकर सोसायटी आदींचे पदाधिकारी तसेच शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार आदी उपस्थित होते.


















