कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याने हाती घेतलेले कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक असला तरी आम्ही ४.५ लाख टन ऊस गाळप आणि ५० लाख लि. स्पिरीट उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी केले. गोडसाखरच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण होते. कार्यक्रमात पताडे व ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आलेय तर संचालक शिवराज पाटील व दीपा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.
अध्यक्ष पताडे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून भरीव अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्याने कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे काम गतीने करणे शक्य झाले. सध्या आसवनी आधुनिकीकरण व इथेनॉल प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप वेळेत होणार असून उपपदार्थ निर्मितीमुळे उसाला जादा दर देणे शक्य होणार आहे. निवृत्त कामगारांना ग्रॅच्युईटीची १ कोटी ४० लाख अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान कामगारांचे थकीत पगार देण्याची कार्यवाही सुरू असून ‘यंदा उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ६५०० हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. उपाध्यक्ष चव्हाण यांनी यंदाच्या दिवाळीत कामगारांना ८.३३ टक्के बोनस देणार आहे अशी घोषणा केली. सभासदांना गणेश चतुर्थीपासूनच सवलतीची साखर देण्यास सुरूवात केली आहे असे ते म्हणाले. यावेळी केडीसी बँकेचे प्रतिनिधी संतोष पाटील, प्रशासन अधिकारी शामराव हरळीकर आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी स्वागत केले. संचालक अक्षयकुमार पाटील यांनी आभार मानले.


















