कोल्हापूर : थकीत एफआरपी तातडीने द्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साखर सहसंचालकांना निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. मार्चअखेर पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ आली असताना, हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांवर तातडीने जप्तीची कारवाई करून व्याजासह थकबाकी द्यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली. याबाबत सोमवारी विभागीय साखर सहसंचालकांना निवेदन देण्यात आले. थकबाकीदार कारखान्यांवर तातडीने ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करून साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावेत, अशी मागणीही करण्यात आली.

जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, वैभव कांबळे, संभाजी चौगुले, गब्बर पाटील, महेश मोहिते, ज्ञानदेव पाटील, संभाजी सांबळे, विलास पाटील, अमोल नाईक, चंद्रकांत कुरणे, शिवाजी आंबेकर तसेच ज्ञानदेव ढोले, वसंत मोरे, शिवाजी मोरे, नामदेव मोरे, कृष्णदेव मोरे, विशाल मोरे आदींनी साखर सहसंचालक डोंगरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना ६५० कोटी रुपये कारखान्यांकडे अडकून पडले आहेत. मार्चअखेरपर्यंत पीककर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ अडचणी येणार आहेत. वेळेत कर्जफेड न झाल्यास व्याजाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागेल, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here