कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील फराळे येथील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर युनिट क्रमांक 3 येथे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले. संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांच्या हस्ते हा पूजाविधी पार पडला.या कार्यक्रमास सरपंच वैशाली डवर, सरपंच सुवर्णा परीट, शत्रुघ्न पाटील, साताप्पा खाडे, शरद पाटील, नाना जाधव, संभाजी देसाई, पंकज पवार, अशोक वाडकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी वेगाने सुरू असल्याची माहिती संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांनी दिली. यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन असून, सुमारे चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यावर्षी परिसरात ऊस पिकाची स्थिती चांगली असून ऊस उत्पादकता समाधानकारक राहण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाला योग्य व चांगला दर मिळावा, यासाठी ओंकार ग्रुप कटिबद्ध असल्याचे बोत्रे-पाटील यांनी सांगितले. आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.


















