कोल्हापूर : यंदाच्या उसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपल्यानंतर टनामागे ५०० रुपयांच्या अंतिम हप्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीतर्फे आज चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्यापासून सकाळी दुचाकी रॅली काढली. सायंकाळी ही रॅली येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. येथे रॅलीचे रूपांतर कोपरा सभेत झाले. बाजारात वाढलेला साखरेचा दर लक्षात घेता यंदाच्या उसाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मागितली आहे. हा दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावेत, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी येथे दिला.
गड्यान्नावर म्हणाले की, कारखाना सुरू करण्याची हौस असलेल्यांनी आधी ऊस दर जाहीर करावा, कोणाचे तरी ऐकून कारखाने सुरू केले तर याद राखा, गाठ स्वाभिमानीशी आहे. कर्नाटकातील रयत संघटना व स्वाभिमानीतर्फे यंदाच्या ऊस आंदोलनाची सुरुवात केली. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरावरील मोर्चापासून सुरुवात केली. दिल्लीतील बैठकीनंतर महामार्ग रोको आंदोलन केले. तेथेही आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाणार आहे. दरम्यान, या सभेनंतर धामणे (ता. आजरा) येथे या दुचाकी रॅलीची सांगता झाली. यावेळी रमेश आरबोळे, तानाजी सावंत यांची भाषणे झाली. बसवराज मुत्नाळे, अशोक पाटील, धनाजी पाटील, अजित तुरटे, पंचायत समिती सदस्य शिवगोंडा पाटील, सुभाष पाटील, दीपक पाटील, शंकर मगदूम, शिवमूर्ती फुंडे आदी उपस्थित होते.


















