कोल्हापूर : तांबाळे (ता. भुदरगड) येथील अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटकडून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या २,४८,३१९ टन उसाचे बिल संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ऊस बिलाची रक्कम नियोजित मुदतीपूर्वीच, म्हणजेच ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जे वेळेत फेडणे सुलभ होणार आहे.
दरम्यान, पुढील गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करार संबंधित गट कार्यालयांमध्ये सुरू केले आहेत. ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस पुरवठा वाढवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे काम कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागाकडून सुरू असल्याची माहिती दिली. संबंधित ऊस वाहतूकदारांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.


















