कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यात ऊस रोपे विक्री मंदावली, गायब झालेल्या पावसामुळे रोपवाटिका संकटात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि हातकणंगले या दोन तालुक्यांत सर्वाधिक सुमारे ५५० रोपवाटिका आहेत. साधारणतः दीड कोटीपर्यंत रोपांची निर्मिती केली जाते. त्यासाठी साधारणतः १३०० टनांपर्यंत ऊस बियाणे लागले. सुमारे साडेपाच हजार मजूर या उद्योगात काम करतात. या ऊस रोपवाटिकांचा हंगाम दरवर्षी मे महिन्यापासून वेग घेत असतो. मात्र, यंदा जून महिना सुरू झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने रोपवाटिका ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस गायब झाल्याने रोपांची विक्री मंदावली आहे. शेतकरी आडसाली ऊस लागवडीऐवजी ‘एकसाली’ लागवडीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ऊस रोपांची मागणी कमी असली, तरी सप्टेंबरनंतर रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज ऊस रोपवाटिका चालकांचा आहे.

सध्या ऊस रोपवाटिकांमध्ये राज्याच्या नाशिक भागातून व शेजारील कर्नाटक राज्यातून रोपांना मागणी आहे. मात्र, ती अपेक्षेप्रमाणे नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर रोपांचे उत्पादन घेतले गेले असले, तरी मागणी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने विक्रीचा वेग मंदावला आहे. आगामी काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढल्यास ऊस लागवडीला गती मिळून रोपांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही तालुक्यातील दर्जेदार ऊस रोपांमुळे पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकातून मोठी मागणी असते. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे नियोजन पुढे ढकलले आहे. स्थानिक बाजारातील मागणी यंदा जवळपास ठप्प आहे. सद्यस्थितीत रोपवाटिका व्यवसायाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे रोपांच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तर ‘कोकोपीट’ च्या दरात प्रतिटन सुमारे अडीच हजार रुपयांची वाढ झाली असून मजुरी व इतर कच्च्या मालाच्या खर्चवाढीमुळे रोप उत्पादकांवर आर्थिक ताण वाढला आहे. रोपांची विक्री कमी आणि इतर खर्च वाढल्याने दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here