कोल्हापूर : चालू ऊस गळीत हंगामात प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात १८५ किलोमीटरची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीला जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हातकणंगलेतून रॅलीला सुरुवात
हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी रॅलीला सुरुवात झाली. हजारो शेतकरी दुचाकींसह सहभागी झाले होते. हातात संघटनेचे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी ऊस दराच्या मागणीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हातकणंगले येथून सुरू झालेली ही रॅली कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वाठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या गावांतून मार्गस्थ झाली. अखेर कसबा सांगाव येथे रॅलीची सांगता झाली.
सात किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग
रॅलीदरम्यान विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः राधानगरी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने दुचाकींची रांग सुमारे सात किलोमीटरपर्यंत लांबली होती. त्यामुळे सांगाव येथील सांगता सभेला उशीर झाला. या रॅलीमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णवार, सचिन शिंदे, धनाजी पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, विक्रम पाटील आणि विशाल चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
सीमाभागातील शेतकऱ्यांची एकजूट
कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकरीही या आंदोलनात एकत्र आले आहेत. दोन्ही राज्यांतील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी ऊस दराच्या प्रश्नावर एकजूट दाखवल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासमोर पेच निर्माण झाला आहे.
“शेतकऱ्यांचा ऊस काही फुकटचा नाही. त्याला योग्य दर मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. येत्या चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने एकत्र बसून समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल,” असा इशारा राजू शेट्टी यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना दिला.


















