कोल्हापूर : राज्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ते उसाला प्रतिटन पाच हजार रुपये देणे शक्य नसल्याचे खासगीत सांगत आहेत. मात्र, जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी एकाच व्यासपीठावर यावे. हा दर देणे कसे शक्य आहे आम्ही पटवून देऊ, असे आव्हान आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. यंदा ऊस टंचाई, दुष्काळी परिस्थितीमुळे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा अशी स्थिती आहे. असे ते म्हणाले. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचाही कधीतरी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चुडमुंगे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. पाच हजार रुपयांचा दर निश्चित करताना आम्ही साखरेचे दर, भविष्यातील स्थिती, कारखान्याचा नफा तसेच उसाचा उत्पादन खर्च या बाबींचा विचार केला आहे. शेतकरी जगला तरच कारखाने टिकणार आहेत, ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर कारखानदार व आंदोलकांच्या भावना समजून घेणार आहेत. दरम्यान, बेळगावमध्ये कर्नाटक राज्यातील ८१ साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची शासनाने संयुक्त बैठक सोमवारी (ता. २६) आयोजित केली आहे. महाराष्ट्रात मात्र दर निश्चित होण्याआधीच कारखाने सुरू करण्यासाठी शासन कारखानदारांवर दबाव आणत आहे असा आरोप चुडमुंगे यांनी केला.


















