कोल्हापूर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे आज, शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील मंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. सहकार क्षेत्रातील समस्या, अडचणी आणि उपाययोजना यासाठी इचलकरंजी येथे दहा मिनिटांच्या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्हा बँकेचे नाबार्डकडे थकीत असलेल्या ११२ कोटी रुपयांच्या निधीच्या विषयाचा समावेश आहे. साखर कारखान्यांच्या हंगामाचे दिवस कमी झाले आहेत. ऊस उत्पादनावर इतर घटकांचा परिणाम होत आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर भर दिल्यास ऊस उत्पादन वाढेल. साखर कारखान्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पॅकेज दिले, तर पुन्हा एकदा साखर कारखान्यांना पर्यायाने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा होईल. साखरेचे दर वाढविले तर त्याचाही फायदा कारखान्यांना होईल, अशी अपेक्षा आहे. या विषयांवर या भेटीत चर्चा होणार आहे.
केंद्रीय सहकारमंत्री शहा यांनी सहकारातील समस्या आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी दहा मिनिटांचा कालावधी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह साखर कारखानदारांना दिला आहे. जर सकारात्मक निर्णय झाला तर अनेक समस्या सुटणार आहेत. सहकारातील समस्या सोडविण्याबाबत मंत्री शहा यांनी सकारात्मकता दाखविल्यास नक्कीच सहकार चळवळ पुन्हा एकदा जोमाने उभी राहील, अशी आशा व्यक्त होत आहे. सहकारातील सर्व संस्था आता डिजिटल होत आहेत. त्यालाही आणखी प्रोत्साहन मिळाले, तर शेतकऱ्यांसह सहकारातील डिजिटल क्रांती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याविषयी उत्सुकता आहे.


















