सांगली : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आज नावीन्यपूर्ण योजना राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळात जलसिंचन योजनांचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाची मदत मिळवून नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असून यासाठी आधुनिक ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ठिबक सिंचनामुळे शेती उत्पादनात निश्चितच वाढ होईल असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. पेठ (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील, संपतराव पाटील, अभिराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंदा माळी, धोंडीराम कदम, संदीप पाटील, जयंत पाटील, हंबीरराव पाटील, शहाजी नायकल, जयकर कदम उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेला कारखाना आज प्रगतीच्या नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. कारखान्याने विविध योजना सुरु करून साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोफत घरपोच साखर, अनेक वेळा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली. राज्य, देशपातळीवरील अनेक पुरस्कारही कारखान्याने पटकावले आहेत. यावेळी अतुल पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्टपणे कामकाज करत आहे. येत्या काळातही आम्ही डॉ. सुरेशबाबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहोत असे सांगितले. अभिराज पाटील, मोहन मदने यांनी मनोगत व्यक्त केले. फिरोज ढगे यांनी स्वागत केले. शिवाजी केनचे संचालक संदीप पाटील यांनी आभार मानले.


















