लातूर : जिल्ह्यात या वर्षी मोठे पाऊसच झालेले नाहीत. सरासरी ५० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस भरलेला नाही. उसामध्ये पाण्याचा अभाव आहे. आता ऑक्टोबर महिन्यातच उसाला पाणी कसे द्यायचे हा प्रश्न आहे. काही ठिकाणी ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे कारखाने ऊस कसा लवकर घेऊन जातील याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात मांजरा, विकास, विकास दोन, रेणा, ट्वेंटीवन, जागृती, सिद्धी, किल्लारी, मारोती महाराज, अंबुलगा साखर कारखाने आहेत. तसेच गुळ पावडर तयार करणारे काही कारखाने आहेत. या कारखान्याचे हंगाम सुरु झाले आहेत. सरासरी तीन हजार रुपये पहिला हप्ता देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र यावर्षी ऊस गाळपात ५० टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, परिणामी साखर उत्पादनही निम्म्यावर येणार आहे.
गेल्या वर्षी ५८ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. पण या वर्षी अंदाजे २५ ते ३० लाखच टन ऊसाचे गाळप होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात गाळप होणाऱ्या उसामध्ये साखरेचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने कारखानदारी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. पावसाअभावी ऊस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होत आहेत. पण अपेक्षित गाळप होणार नाही अशी स्थिती आहे. त्यात गाळप पन्नास टक्क्यांवर येणार आहे. उताराही कमी राहण्याची शक्यता आहे. कारखाने सुरू करण्यासाठी देखील कारखान्यांना टँकरने पाणी आणावे लागत आहे. अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे उसाची वाढ झाली नाही. तीव्र दुष्काळाच्या स्थितीमध्ये किमान कारखान्याने प्रति टन पाच हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तरच शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल असे अंबुलगा बुद्रूक येथील शेतकरी सुभाष शिंदे यांनी सांगितले. तळेगावच्या जागृती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्ममराव मोरे यांनी यावर्षी पाण्याअभावी इथेनॉल प्रकल्प बंदच ठेवावे लागणार अशी परिस्थिती आहे. राज्य सरकारने तामिळनाडूप्रमाणे ऊस उत्पादकांना मदत देण्याची गरज असल्याचे सांगितले.


















