लातूर : बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मधील ११ जून रोजी प्रतिटन १६१ रुपयांची तिसरी व अंतिम उचल अदा करण्यात आली आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने २ लाख १७हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. हंगामाच्या सुरवातीला प्रतिटन २ हजार ७५० रुपयांची पहिली उचल अदा करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिटन १०० रुपयांची दुसरी उचल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. कारखाान्याच्या पहिली, दुसरी आणि अंतिम उचल मिळून शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ११ रुपये इतका अंतिम ऊसदर मिळाला आहे. अंतिम हप्त्यापोटी शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ५० लाख ९ हजार ३६ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
कारखान्याला माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे नवसंजीवनी मिळाली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हाइस चेअरमन सचिन पाटील आणि संचालक मंडळाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सभासदांकडून सांगण्यात येत आहे. अनेक साखर कारखान्यांकडून अद्याप केवळ पहिली उचलच अदा करण्यात आली असून अनेक शेतकरी पुढील उचलीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याने हंगाम संपल्यानंतर अल्पावधीत अंतिम ऊसदर अदा करून शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ केला.


















