लातूर : येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील अंतिम ३२७.६२ रुपयांचा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ७ लाख १५ हजार ४०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख ८८ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन मिळवले आहे. राज्य सरकारच्या १५ एप्रिलच्या निर्णयानुसार अंतिम साखर उतारा आणि ऊस तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन एफआरपी निश्चित करण्यात आली. त्यानुसार कारखान्याची एफआरपी ३१७७.६२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना यापूर्वी २८५० रुपये प्रति टन ऊस बिल अदा केले आहे. आता उर्वरित पैसे जमा करण्यात आले आहेत.
कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगाम यशस्वी झाला आहे. कारखान्याला यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उतारा १२.३० टक्के मिळाला आहे. कारखान्यांनी २ कोटी ९८ लाख ४९ हजार ५०८ युनिट वीज निर्यात केली आहे. याशिवाय २,१४,८९,६१९ लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले आहे आतापर्यंत १,८०,३०,००० लिटर इथेनॉल इंधन वितरण कंपन्यांना पुरविण्यात आले आहे. याशिवाय २,३७,३४,०९५ लिटर अल्कोहोल आणि १,२४,०९३.३५ किलो सीबीजी उत्पादन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. कारखान्याने गळीत हंगामात आतापर्यंत २२७ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना दिली असल्याचे प्रशासनाने सांगितले.


















