लातूर : विलास साखर कारखान्यात गळीत हंगामाची तयारी सुरू; मिल रोलरचे पूजन उत्साहात

लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २१) कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख आणि संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चेअरमन देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या. कारखान्याकडे सभासदांच्या १४ हजार ७१९.७८ हेक्टर तर बिगर सभासदांच्या ६ हजार ११३.०९ हेक्टर अशी एकूण २१ हजार ३२.८७ हेक्टर उसाची नोंद झालेली आहे. हंगामात जास्तीत जास्त ऊस हा यंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

गळीत हंगामाच्या तयारीबाबत झालेल्या या आढावा बैठकीस व्हाइस चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रणजित पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, दीपक बनसोडे, लताबाई देशमुख, सुभाष माने, ऊस उत्पादक सभासद रमेश देशमुख आदी उपस्थित होते. कारखान्यात सध्या हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की, मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here