लातूर : बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलापोटी दुसरा हप्ता प्रतिटन १०० रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिलेला मांजरा परिवाराच्या बरोबरीने दर देऊ हा शब्द संचालक मंडळाकडून प्रत्यक्षात उतरवल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी स्व. विलासराव देशमुख यांनी उभारलेला हा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. मात्र आ. अमित देशमुख यांनी शासनाची हमी मिळवून देत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कारखान्याने चालू गाळप हंगामात कारखान्याने उसाला प्रतिटन ३ हजार ११ रुपये दर जाहीर केला होता. त्यापैकी पहिली उचल म्हणून २ हजार ७५० रुपये देण्यात आले होते. हंगाम संपल्यानंतर अवघ्या महिनाभरात दुसरी उचल म्हणून १०० रुपये प्रतिटन रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित रक्कमही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आहे. तर सध्या शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत मांजरा परिवाराने उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला आर्थिक आधार दिलासादायक असून क्रांतिकारी शेतकरी संघटना त्याबद्दल मांजरा परिवाराचे प्रमुख दिलीपराव देशमुख यांचे विशेष कौतुक आहे असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी सांगितले.


















