लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या आर्थिक बळकटीकरणासाठी आता कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सीबीजी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मळी, प्रेसमड, वेस्टवॉश तसेच शेतीतील अवशेषांचा वापर करून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केला जाणार असून, आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादकांना ३ हजार १११ रुपये प्रतिटन ऊसदर देण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.
औसा येथील विजय मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. आठ) झालेल्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बंद अवस्थेतील कारखाना पुन्हा सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आव्हान होते. मात्र, आता कारखाना सुस्थितीत असून काही कर्जाची परतफेडही करण्यात आली आहे. साखरेबरोबरच उपपदार्थांच्या माध्यमातून उत्पन्न वाढवून कारखान्याची आर्थिक घडी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सीबीजी प्रकल्पासाठी खासगी कंपनीसोबत भागीदारी करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी कंपनीकडून भांडवली गुंतवणूक केली जाणार असल्याने कारखान्यावर मोठा आर्थिक भार पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी सभेत मार्गदर्शन केले. सभेस कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


















