लातूर : यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे अनेक भागांत उसाचे नुकसान झाले असून, उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षासाठी उभ्या असलेल्या खोडवा उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुरवातीला काही विशिष्ट जातींमध्ये दिसणारा हा रोग आता प्रचलित जातींमध्येही मोठ्या प्रमाणात आढळू लागला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असताना आता ‘काणी’ या रोगामुळे पुढील हंगामातील उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काणी या रोगामुळे उसाची वाढ खुंटते, कांड्या बारीक राहतात आणि उत्पादनात मोठी घट होते. तज्ज्ञांच्या मते, उत्पादनात २९ ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
यावर्षी पाण्याचे मुबलक प्रमाण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढवले आहे. मात्र, त्याच क्षेत्रात काणी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर कृषी सहायक प्रशांत सरवदे यांनी सांगितले की, काणी रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. रोगग्रस्त कोंब काढून नष्ट करणे, निरोगी बेणे वापरणे आणि शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची वेळेवर फवारणी केल्यास रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.


















