लातूर : मांजरा नदीकाठच्या उसालाही पाणीटंचाईचा फटका, शेतकरी हवालदिल

लातूर : अहमदपूर तालुक्यात दोन हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने मांजरा नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. गाळप हंगाम तोंडावर आल्याने तोपर्यंत पीक टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. जवळगा, हिसामनगर, हेळंब, धनेगाव, टाकळी, लासोना, बोरोळ, गौंडगाव, बटनपूर आणि इंद्राळ आदी गावांतील ऊस उत्पादकांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. कोरडे प़डलेले नदीपात्र, बोअरवेल व विहिरींची पाणीपातळी खालावल्याने ऊस आणि खोडवा पिकाला नियमित पाणी देणे कठीण झाले आहे. पावसातील खंडामुळे जलस्रोतांवरील ताण वाढला असून विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यातच खते, औषधे, मजुरी, सिंचन व मशागतीच्या खर्चात वाढ झाल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मांजरा नदी, तलाव, बंधारे आणि विहिरींच्या पाण्यावर या भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. सुरवातीला उपलब्ध पाण्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली. मात्र, आता अडचणी उद्भवल्या आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर सध्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी आणि पंचनाम्यांमध्ये ऊस पिकाची नोंद केली आहे. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे दुष्काळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या ऊस पिकाचाही मदतीसाठी शासनाने विचार करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी किसन वळसंगे म्हणाले की, उसावरच वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस विक्रीनंतर कर्जफेड, मुलांचे शिक्षण आणि घरखर्चाची कामे मार्गी लागतात. आता पाण्याअभावी पीक अडचणीत आल्याने आर्थिक गणितच बिघडण्याची भीती आहे. गुळ उद्योजक कुमार पाटील यांनी खत, औषधे, मजुरी आणि सिंचनाचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. मोठा खर्च करून पीक उभे केले; मात्र पावसाने साथ न दिल्याने मांजरा नदी कोरडी पडली आहे. गाळपापर्यंत ऊस टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे असे सांगितले. दरम्यान, दुष्काळाचे सावट असल्याने वैरणीचे दर गगनाला भिडले आहेत. वैरण मिळणेही मुश्कील झाले आहे. चाऱ्याचे दर वाढले, मात्र बाजारात पशुधनाचे दर कमी झाले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here