लातूर : मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने युवकांना ऊस तोडणी यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण

लातूर : मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रात एल. एस. गोहिल मेमोरियल फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आयोजित ऊस तोडणी यंत्र चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ मंगळवारी (ता. ११) करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत या प्रशिक्षण शिबिराच्या उ‌द्घाटन समारंभाला रेणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, विलास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, तीर्थ अॅग्रो टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष विश्व सोमण्णावर, हेतल शाह उपस्थित होते. शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर झपाट्याने वाढत आहे. ऊस तोडणी यंत्रांसाठी प्रशिक्षित चालकांची मोठी गरज निर्माण झाली आहे. ती लक्षात घेऊन याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम पाच दिवसांचा असून, चालू वर्षात १५ प्रशिक्षण तुकड्या आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे युवकांच्या कौशल्य विकासासोबतच कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणालाही चालना मिळेल. सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप देशमुख यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करत ऊस तोडणी यंत्रांचा वाढता वापर आणि त्यासाठी आवश्यक कुशल व प्रशिक्षित चालकांची वाढती मागणी याची माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमात ऊस तोडणी यंत्राचे सुरक्षित व कार्यक्षम संचालन, यंत्राची तांत्रिक माहिती, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमास फाउंडेशनचे प्रतिनिधी, विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी, शास्त्रज्ञ सतीश बेद्रे, डॉ. प्रदीप उलेमाले, डॉ. शरद साळुंखे, डॉ. सचिन शिंदे आदींसह प्रशिक्षणार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजली गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन शिंदे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here