लातूर : विलास साखर कारखान्याकडून ३२१ रुपयांच्या अंतिम हप्त्याची घोषणा, शेतकऱ्यांना प्रतिटन ३१७१ रुपये दर

लातूर : निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामातील उसासाठी यापूर्वी प्रतिटन २,८५० रुपये दराने बिल अदा केले होते. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून मशागत, पेरणी, बियाणे, खते आदींसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासणार असल्याचे लक्षात घेऊन कारखान्याने तातडीने अंतिम ऊसदर जाहीर करून अंतिम हप्ता अदा करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने अंतिम दरानुसार प्रतिटन ३२१ रुपये प्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे कारखान्याने उसाला उच्चांकी भाव देण्याची परंपरा यंदाही कायम राखली. कारखान्याने गाळप हंगामातील ऊसाला प्रतिटन ३,१७१ रुपयांचा विक्रमी अंतिम भाव जाहीर केला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्यानंतर सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना म्हणून विलास साखर कारखान्याने स्थान मिळविले आहे. मांजरा कारखान्याने प्रतिटन ३,१७७ रुपये दर जाहीर केला. त्याखालोखाल रेणा साखर कारखान्याने ३,१६९ रुपये, जागृती शुगरने ३,१६२ रुपये, तर संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याने ३,०११ रुपये दिले आहेत.

कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की, मांजरा परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक आमदार अमित देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख आणि कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कारखान्याने ६ लाख ५१ हजार ४३१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला असून ७ लाख १४ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज निर्मिती केली असून त्यापैकी २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून १ कोटी १ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादनही झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here