पुणे : साखर आयुक्त कार्यालयाने २०२६-२७ गाळप हंगामाची तयारी पूर्ण केली असून राज्यातील परवानाप्राप्त सहकारी आणि खाजगी साखर कारखाने १५ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करू शकतात, असे राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, राज्यातील सन २०२६-२७ च्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबर २०२६ किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सूचित करण्यात येते कीः
१. ज्या कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी (Crushing License) आवश्यक ते सर्व कायदेशीर व प्रशासकीय निकष पूर्ण केले आहेत, ते कारखाने १५ ऑक्टोबर २०२६ पासून किंवा त्यापूर्वी आपला गाळप हंगाम सुरू करू शकतात.
२. शासनाच्या वतीने गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची कोणतीही सक्ती नाही.
३. जे साखर कारखाने १५ ऑक्टोबर पूर्वी गाळप करण्यासाठी अर्ज करतील त्यांनाही गाळप परवाना देण्यात येईल.
४. सर्व कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक तो अधिकृत गाळप परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी व संबंधित घटकांनी शासनाच्या आणि साखर आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून २०२६-२७ चा गाळप हंगाम सुरळीत पार पाडावा, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी केले आहे. आगामी गाळप हंगाम तयारीबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले कि, मागील हंगामातील 100 टक्के एफआरपी दिलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. तसेच साखर आयुक्त कार्यालयाकडून गाळप हंगाम तयारीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना योग्य त्या सूचना केल्या जात आहेत.


















