नवी दिल्ली : जून महिन्यात मान्सूनचा मंद वेग आणि सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस भारतीय साखर उद्योगासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. ‘सीएनबीसी टीव्ही18’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एलारा सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट (इन्स्टिट्यूशनल इक्विटी) प्रशांत बियानी यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत पावसाची परिस्थिती सुधारली नाही तर देशातील साखर उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
बियानी यांच्या मते, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये कमकुवत मान्सून आणि एल-नीनो परिस्थितीत सर्वाधिक प्रभावित होतात. कारण या राज्यांतील ऊस शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश राज्यात कालवा सिंचन व्यवस्था असल्याने परिस्थिती तुलनेने चांगली आहे. मात्र, पावसाची कमतरता कायम राहिल्यास तेथील ऊस उत्पादनावरही काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.ते म्हणाले की, ऊस पिकासाठी मान्सूनचे चार महत्त्वाचे महिने – जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर – यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चांगला पाऊस ऊस उत्पादनासाठी निर्णायक ठरतो.
मान्सूनचा मंदावलेला वेग वाढवतोय चिंता…
स्कायमेट वेदर सर्व्हिसेसच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवर सुरुवातीची चांगली प्रगती केल्यानंतर 8 जूनपासून जवळपास स्थिरावलेली स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख कृषी पट्ट्यांमध्ये पावसाबाबत चिंता वाढली आहे. देशभरातील पावसाची तूट आधीच 32 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, हवामानात सुधारणा झाली नाही तर पुढील आठवड्यात ती 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंड ही राज्ये कमी पावसाच्या सर्वाधिक जोखमीच्या श्रेणीत आहेत. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाला मिळणार आधार…
पावसाविषयीच्या चिंतेसह कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली नरमाई असली तरी साखर उद्योगाचा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला दिले जात असलेले प्रोत्साहन आणि 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल इंजिनांना दिलेली मान्यता यामुळे उद्योगासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. प्रशांत बियानी यांच्या मते, यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने साखरेचे दर मजबूत राहू शकतात. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे अलीकडे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली तेजी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सरकारी हस्तक्षेपामुळे बाजारात राहील समतोल…
बियानी यांच्या मते, साखर क्षेत्रावर सरकारी धोरणांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या क्षेत्रात अतिवेगाने वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता मर्यादित असते. जर ऊस उत्पादनात घट झाली तर सरकार इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर काही प्रमाणात मर्यादित करू शकते. त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढेल आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचा समतोल राखला जाईल. एकूणच, कमी पावसामुळे ऊस आणि साखर उत्पादनावर दबाव येण्याची शक्यता असली तरी इथेनॉल क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे भारतीय साखर उद्योगाचा दीर्घकालीन विकासाचा मार्ग खुला राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















