सांगली-ईश्वरपूर मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले

सांगली : ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत वाळवा तालुक्यात आंदोलन सुरू केले आहे. सांगली-ईश्वरपूर मार्गावरील वाळवा फाटा येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा, राजारामबापू, सर्वोदय आणि दालमिया शुगर या साखर कारखान्यांकडे जाणारी ८० हून अधिक ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर रोखून धरली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत छावणी आंदोलनाला सुरुवात केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी कोल्हापूर येथे छावणी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार वाळवा तालुक्यात या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत चालू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊसदराच्या मागणीकडे कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी वाळवा फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाने पिकवलेल्या उसाचा योग्य आणि रास्त मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आष्टा पोलिस ठाण्याच्या वतीने घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी, भागवत जाधव, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, सचिन यादव, शामराव जाधव, गनी मुल्ला, संजय अनुसे, कासिम जमादार, प्रवीण माळी, हर्षद कोळी यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ऊसदराचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here