पुणे : चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादनात लक्षणीय घट झाली असून मार्चअखेरपर्यंत एकूण २७१ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गतहंगामात साखर उत्पादनात आघाडीवर गेलेल्या उत्तर प्रदेशाला महाराष्ट्राने यंदा पुन्हा मागे टाकले आहे. सध्या महाराष्ट्रात ९८ लाख टन तर उत्तर प्रदेशात ८७ लाख टन साखरनिर्मिती नोंदवली गेली आहे. देशातील ५४१ साखर कारखान्यांपैकी तब्बल ४६७ कारखाने बंद झाले असून, यंदा उसाचे गाळप मात्र वाढले आहे. गतहंगामाच्या तुलनेत १८० लाख टनांनी वाढ होऊन एकूण २८३५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
उताऱ्याच्या बाबतीतही देशाने प्रगती दर्शवली आहे. गतवर्षी ९.३७ टक्के असलेला उतारा यंदा ९.५६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, एकूण साखर उत्पादनाचा अंदाज ३५० लाख टनांवरून कमी होऊन ३१५ लाख टनांपर्यंत घसरला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात ११० लाख टन आणि उत्तर प्रदेशात १०५ लाख टन साखरनिर्मिती होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत उत्तर प्रदेश साखर उत्पादनात आघाडीवर होता. गतहंगाम वगळता महाराष्ट्रानेही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यंदा उत्तर प्रदेशात उसावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने गाळपात घट झाली. मात्र, उताऱ्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश अजूनही अव्वल असल्याचे दिसून येते.

















