कोल्हापूर : केंद्र सरकारचा १९६६ च्या ऊस नियंत्रण कायद्यात बदल करून इथेनॉल निर्मिती व डिजिटलायझेशनसारख्या आधुनिक गरजांनुसार नवीन ऊस नियंत्रण २०२६ कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकार ने मते, सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. संभावित ऊस नियंत्रण २०२६ कायद्यामध्ये कच्चा माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना स्थान दिले नव्हते. याबाबत देशभरातील शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केल्याने हा ऊस नियंत्रण आदेशाचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. कायद्यात दुरुस्ती करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. याविरोधात जय शिवराय शेतकरी संघटनेने हरकत नोंदवली होती. अखेर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला ‘ऊस (नियंत्रण) आदेश २०२६’ चा मसुदा मागे घेतल्याचे पत्रक संबधित विभागाने शुक्रवारी काढले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय ?
इथेनॉल, सहवीजनिर्मिती, बायोफर्टिलायझर्स आदी उपपदार्थातून शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, झोन बंदी शेतकऱ्यांवर लादू नये, उसाची एफआरपी निश्चित करताना उत्पादन खर्चावर आधारित हवी, एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी कारवाई करावी, उसाचे करार वैयक्तिक करू नयेत, एफआरपीचा पंधरवड्याचा अहवाल द्यावा, त्यामध्ये व्याजाचा रखाना असावा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले कि, साखर उद्योगाचा मूळ पाया हा कच्चा माल ऊस पिकविणारा शेतकरी आहे. त्याच्या अडचणी बाबतीत सरकारला काही ऐकायचं नसेल, तर कायदा नेमका कोणासाठी बदलत आहेत? यामध्ये झोनबंदी, कारखानदारांसोबत शेतकऱ्यांचे ऊस दराबाबतचे करार, ऊस बिले वेळेत न दिल्यास वैयक्तिक तक्रार करावी लागणार असे अनेक कायदे चुकीच्या पद्धतीने होणार आहेत. त्याला संघटनेच्या वतीने विरोध केला होता. त्याला यश मिळाले.


















