सातारा : साखरेच्या एमएसपी वाढीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. त्यासाठी येत्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ घेऊन साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पाच लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यात फडणवीस बोलत होते. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साखरेच्या किमान विक्री दराबाबत व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात पुढच्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक आयोजित करू. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा १२ रुपये ३५ पैसे दराने शासन आजपासूनच खरेदी केला जाणार आहे. तर गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला १३ लाख घरे मिळाली. परंतु, गेल्या वर्षी केंद्र शासनाने राज्यासाठी रेकॉर्ड ब्रेक ३० लाख घरांचे उद्दिष्ट दिले. यामुळे सव्वा कोटी लोकांना त्यांच्या डोक्यावर पक्के छत मिळणार आहे. या घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. पुढील वर्षात १५ लाख गरिबांना घरे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घर मिळणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला कायमपणे मोफत वीज देण्यासाठी सौर ऊर्जेसाठी अनुदान देण्यात येत आहे.


















