पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) थकवून ठेवणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाने कठोर कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे थकीत देणे न दिल्यामुळे राज्यातील सात साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) जारी करून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच एफआरपी थकविणाऱ्या आणखी सात कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी १५ मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर्सला पहिले आरआरसी जारी करून या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर २२ मे रोजी आणखी सहा कारखान्यांवरही कारवाई करण्यात आली. आरआरसी जारी झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची थकीत देणी वसूल करण्याचा अधिकार प्राप्त होतो. राज्यातील प्रभावशाली नेत्यांशी संबंधित कारखान्यांवरही कारवाई सुरू झाल्याने साखर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तीन सहकारी आणि चार खासगी साखर कारखान्यांवरील जप्तीची प्रक्रिया सुरू असतानाच साखर आयुक्तालयाने आणखी सात कारखान्यांना नोटिसा पाठवत दबाव वाढवला आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी या कारखान्यांना “तुमच्यावर आरआरसी कारवाई का करू नये?” अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळालेल्या सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना १५ जून रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील साखर आयुक्तालयात सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. संजय कोलते यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले की, २०२५-२६ च्या गाळप हंगामातील एफआरपी न दिल्यामुळे सात कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित कारखान्यांनीही शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने अदा करावी, अन्यथा त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.
आरआरसी कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये गोकुळ शुगर्स (सोलापूर), भीमा सहकारी साखर कारखाना (सोलापूर), श्रीसंत कुर्मदास सहकारी साखर कारखाना (माढा), भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (धाराशिव), केदारेश्वर सहकारी साखर कारखाना (अहिल्यानगर), एस. जे. शुगर डिस्टिलरी अँड पॉवर (नाशिक) आणि सचिन घायाळ शुगर्स (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
नोटिसा बजावण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये ग्रीन पॉवर शुगर (सातारा), श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा प्रॉडक्ट्स (जालना), भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना (हिंगोली व नांदेड), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना (लातूर), रेणा सहकारी साखर कारखाना (लातूर) आणि पूर्णा सहकारी साखर कारखाना (हिंगोली) यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर मोठा दबाव निर्माण झाला असून शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रकमा मिळण्याची आशा बळावली आहे.


















