महाराष्ट्र : थकीत ऊस बिलांप्रश्नी १ मेपर्यंत ‘डेडलाइन’, कारखानदारांच्या दारात आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा

पंढरपूर : राज्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने १५ फेब्रुवारी रोजी बंद झाले. आज दोन महिन्यानंतरही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. राज्यभरातील 2 हजार कोटी रुपये ऊस बिल थकीत आहे. हे ऊस बिल येत्या एक मेपर्यंत न दिल्यास संबंधित चेअरमनच्या दारात बसून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. गुरुवारी पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, या कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दोन ते चार पंधरवड्यांचे ऊस बिल थकवले आहे. हवे तर कारखानदारांनी आपल्या घरातील मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. थकीत बिलांबाबत साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आलेली नाही. यापुढील काळात साखर आयुक्तांना घेराव घालून त्यांना जाब विचारला जाईल. दरम्यान, शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक देखील घेतली. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. माढा, पंढरपूर व माळशिरस भागातून या नव्या महामार्गाची गरजच नाही असे ते म्हणाले. या महामार्गातून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर होणार आहे. राज्यकर्त्यांना पैसा उभा करण्यासाठी हा रस्ता हवा आहे, असा आरोप त्यांनी केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here