महाराष्ट्र : ऊस वाहतुकीवेळी बैलांना क्रूर वागणूक देऊ नका : साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

पुणे : साखर कारखान्यांनी ऊस तोड व वाहतूक कामात वापरल्या जाणाऱ्या बैलांना दिवसभरातून ९ तासांहून अधिक काळ वाहतूक करू देऊ नये. तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास बैलांना दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत विश्रांती द्यावी. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीने बैलांची पायी ने-आण करू नये. तसेच बैलांना एका दिवसात ३० किलोमीटरपर्यंत किंवा ८ तासांपेक्षा अधिक श्रम देऊ नये, अशा सूचना साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना केल्या आहेत. कारखान्यांसाठी उसाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना क्रूरतेची वागणूक मिळणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिल्या आहेत.

साखर आयुक्तांनी कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना ‘प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा १९६०’ लागू असल्याचे म्हटले आहे. साखर कारखान्यांनी आजारी, जखमी, कुपोषित किंवा जास्त वय असलेल्या बैलांची काळजी घ्यावी व त्यांना सक्तीची विश्रांती द्यावी. स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने कारखाना परिसरात एक पशुवैद्यक व एका सहायकाची सेवा उपलब्ध करून घ्यावी, असे आदेशदेखील दिले आहेत. बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लादू नये, तसेच सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने-आण करू नये, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर बैलगाडीसाठी वजन काटे बंद ठेवावेत, अशा सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत. कोणत्याही प्राण्याला मारणे, त्याच्यावर अधिक भार लादणे, क्रूरतेने अधिक दामटणे, त्यांच्यावर क्षमतेपेक्षा जास्त वजनांचा भार देणे, त्यांचा छळ किंवा उगीच वेदना व यातना होतील अशा कृत्यासाठी दंड व कारावासाची तरतूद आहे, अशी जाणीव या पत्रात करून देण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here