पुणे : आगामी काळात साखर उद्योगाचे भविष्य साखर कारखान्याच्या गेटवर नव्हे, तर शेताच्या बांधावर ठरेल आणि पुढील टप्प्यात त्या शेताची स्थिती उपग्रह, एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सातत्याने मोजता आली पाहिजे. प्रत्येक हेक्टरमधून अधिक ऊस, प्रत्येक टन उसातून अधिक साखर आणि प्रत्येक घनमीटर पाण्यातून अधिक उत्पादन—हीच भारतीय साखर उद्योगाच्या पुढील दशकाची दिशा असली पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य साखर महासंघातील निवृत्त वाणिज्य व प्रशासकीय अधिकारी तथा विश्लेषक, संशोधक अमरसिंह एम. मोकाशी यांनी व्यक्त केले आहे. ‘एआय’च्या वापरामुळे ऊस विकासाला प्रथमच शेताच्या पातळीपासून कारखान्याच्या पातळीपर्यंत एकात्मिक डिजिटल दिशा मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमरसिंह मोकाशी यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत देशातील साखर उद्योग आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्यांची संख्या आणि गाळप क्षमता वाढविणे, इथेनॉल, सहवीजनिर्मिती, सीबीजी आणि इतर उपपदार्थांमध्ये गुंतवणूक करणे यावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण विस्ताराच्या केंद्रस्थानी असलेला ऊस आणि त्याची दीर्घकालीन उपलब्धता याकडे तुलनेने कमी लक्ष गेले आहे. एआय तंत्रज्ञानाचा निट वापर केल्यास ऊस उत्पादकता वाढविणे, पाणी वाचविणे, उत्पादनाचा अंदाज अधिक अचूक करणे, कापणीचे नियोजन सुधारणे, साखर उतारा वाढविणे आणि कारखान्यांच्या क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य होऊ शकते. प्रत्येक हेक्टरमधून किती ऊस, किती साखर निर्माण करता येते? यावर लक्ष द्यायला हवे. आपण अधिक उत्पादकता, अधिक उतारा, कमी पाणी, डिजिटल बुद्धिमत्ता आणि अधिक मूल्य यावर भर दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.


















