महाराष्ट्र : साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याची माजी मंत्री दांडेगावकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांवर वाढता आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कामगार, वाहतूकदार, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील इतर घटकांवर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कारखान्यांना सुलभ अटींवर सॉफ्ट लोन उपलब्ध करून देण्याची गरज आहे अशी मागणी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच साखर क्षेत्रातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सादर करण्यात आलेल्या निवेदनात कारखान्यांच्या आर्थिक अडचणी, थकीत देणी, आगामी गाळप हंगामातील संभाव्य अडथळे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांचा समावेश आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना आर्थिक बळ देण्यासाठी शासनाने तातडीने सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावे. कारखान्यांना आर्थिक मदत मिळाल्यास ऊस बिले वेळेत अदा करणे, गाळप हंगाम सुरळीत पार पाडणे आणि उत्पादनक्षमता वाढविणे शक्य होणार आहे. याकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत दांडेगावकर म्हणाले की, कारखान्यांवरील आर्थिक संकटाचा परिणाम थेट ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ग्रामीण बाजारपेठेवर होत असतो. त्यामुळे शासनाने कारखान्यांना सॉफ्ट लोन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here