पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे पाच हजार कोटींहून अधिक एफआरपी थकविली आहे. या सर्व साखर कारखान्यांवर आयुक्तांनी जप्तीची कारवाई करावी. कारवाईत दिरंगाई केल्यास आम्ही अवमान याचिका दाखल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेट्टी यांनी गुरुवारी कृषी आयुक्तालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील अनेक कारखान्यांनी दोन महिने उलटून गेल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजू शेट्टी म्हणाले की, कायद्यानुसार ऊसतोडीनंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी द्यायला हवी. उच्च न्यायालयाने सरकारला यापूर्वीच एक आदेश दिला होता. एफआरपीला विलंब केला किंवा तुकडे केले तरी १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम द्यायची आहे. सर्वोच्च न्यायालयात नऊ सुनावण्या झाल्या. मात्र हिताचा आदेश अजूनही कायम आहे. मात्र, सरकारकडून आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अवमान याचिका दाखल करण्याची आम्ही तयारी केली आहे.


















