महाराष्ट्र : राज्यात अद्याप २९९१ कोटींची एफआरपी थकीत, हंगाम संपला तरी संपूर्ण ऊस बिले देण्यास १३९ कारखान्यांची टाळाटाळ

पुणे : राज्यातील गळीत हंगाम एखाद- दुसरा कारखाना सोडल्यास संपला आहे. गाळप हंगाम संपला असला तरी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची सर्वच्या सर्व ऊस बिले देण्यात १३९ साखर कारखाने अपयशी ठरले आहेत. साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २ एप्रिल २०२६ अखेर राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल २९९१ कोटी रुपये थकीत आहेत. आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा थकीत ऊस बिल कधी मिळणार ? याकडे लागल्या आहेत.

2 एप्रिलअखेर ऊसतोडणी वाहतूक खर्चासह ‘एफआरपी’ची देय रक्कम ३९ हजार ९७१ कोटी रुपये इतकी होती. मात्र, कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३६ हजार ९८० कोटी रुपये जमा केले आहेत. याचाच अर्थ कारखान्यांनी ९२.५२ टक्के एफआरपी दिली आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे सुमारे २ हजार ९९१ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्यातील केवळ ७० कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. ८६ साखर कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के, 36 साखर कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के आणि १७ कारखान्यांनी ० ते ५९.९९ टक्के एफआरपी दिली आहे. राज्यातील १३९ कारखाने वेळेत १०० टक्के एफआरपी देण्यात अपयशी ठरले आहेत.

हंगाम संपला आणि आगामी हंगामासाठी कारखानदारांकडून तोडणी वाहतूक करार सुरु करार सुरु करण्यात आले तरीसुद्धा कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. साखर आयुक्तांनी ऊस बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनाकडून होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here