मुंबई : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच राज्य महिला आयोगाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त जगदीश मिनियार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांतील मुलींच्या बालविवाहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासन महत्वपूर्ण पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कुटुंबांतील मुलींना चार महिन्यांच्या कालावधीसाठी बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे स्थलांतर होते. यामुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात. काही ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाणही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कुटुंबांतील मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना चार महिन्यांच्या कालावधीसाठी बालगृहात ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यास मदत होणार आहे. राज्य महिला आयोगाची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीत वाढ करण्यात आली आहे. महिलांसाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम हे गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले पाहिजेत. विविध उपक्रमांचे आयोजन करताना लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा होईल, यावर भर देण्यात यावा. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष जनजागृती आणि सहाय्य उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे.


















