कोल्हापूर : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस पूर्णपणे परिपक्व झालेला नसतो. त्यामुळे या काळात ऊस गाळप केल्यास उतारा कमी राहून प्रत्यक्ष साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरू केल्यास ऊस अधिक परिपक्व अवस्थेत मिळेल आणि साखर उतारा वाढून उत्पादनातही वाढ होईल. कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने आता अनेक कारखाने ९० ते ११० दिवसांत हंगाम पूर्ण करतात. त्यामुळे लवकर गाळप सुरू केल्यास अपरिपक्व ऊस मोठ्या प्रमाणावर गाळला जाईल आणि शेतकरी, कारखानदार यांचे नुकसान होईल असा इशारा जय शिवराय किसान संघटनेने दिला आहे. कारखाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याच्या निर्णयाला संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी विरोध दर्शवला आहे.
अध्यक्ष शिवाजी माने यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. यामध्ये साखरेचे देशांतर्गत उत्पादन वाढावे आणि साखर आयात करण्याची वेळ येऊ नये, १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करणे म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असल्याची टीका त्यांनी केली. अपरिपक्व ऊस गाळल्यामुळे साखर कमी मिळणार आहे. शेतकऱ्यांना कमी रिकव्हरीचा ऊस गाळल्यामुळे साखर उत्पादन घटल्याचे कारण सांगून दरही कमी मिळेल. यावर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यावर पुढील वर्षाच्या उसाचा दर ठरतो. त्यामुळे त्यातून पुढील वर्षाचा दर कमी मिळेल. हंगाम लवकर सुरू केल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढेल. अशा सर्व अडचणींचा विचार करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सदाशिव कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, गब्बर पाटील, भैरू मगदूम यांच्या सह्या आहेत.


















