कोल्हापूर : आगामी काळात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून केंद्र सरकार साखर कारखाने १५ दिवस आधी सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र, यातून नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केला जावा असे तज्ज्ञांचे मत आहे. साखर कारखाने लवकर सुरू केल्यास साखर उताऱ्यात दीड टक्क्यांपर्यंत घट होऊन त्याचा फटका साखर उद्योगातील सर्वच घटकांना बसणार आहे. यामुळे गळीत हंगाम नोव्हेंबरच्या आसपास सुरू करणे कारखाने, ऊस उत्पादकांच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचे आहे, असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे यांनी दैनिक ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
साखर उद्योगातील जाणकारांच्या मते, केंद्र सरकारच्या उपायांनी तात्पुरता दिलासा मिळेल. मात्र, पुढील वर्षात साखर टंचाईचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. साखर उताऱ्यातील घट व उत्पादन कमी होणे ही याची कारणे असतील. गळीत हंगाम लवकर सुरू केल्यास साखर उताऱ्यात एक ते दीड टक्का घट येणार आहे. परिणामी साखरेच्या उत्पादनात घट होऊन प्रति टन सातशे ते आठशे रुपयांचा फटका बसू शकतो. त्याचा परिणाम एफआरपी देण्यावर होईल. साखर कारखान्यांना कसरत करावी लागेल. साखर उतारा घटल्यास पुढील वर्षाची एफआरपी कमी होते. हे नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही सोसावे लागेल. नवा गळीत हंगाम सुरू होताना देशात सुमारे ४० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. नवी साखर नोव्हेंबरच्या २ अखेरीस उपलब्ध होऊ शकते. त्यातून कमी पडणारी चार ते पाच लाख टन साखर बाजारात आणणे शक्य आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


















