महाराष्ट्र : साखर उद्योगाच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील नेमली ९ सदस्यीय समिती

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या थकीत एफआरपी पोटी ५०० रुपये प्रति टन अनुदान, बँकांकडील १३ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठण तसेच हंगाम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पाच हजार कोटी रुपयांचे राज्य सहकारी बँकेकडून घेण्यात येणारे कर्ज, या तीन महत्त्वपूर्ण विषयांबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने २४ एप्रिल २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समितीची स्थापना केल्याचा शासन निर्णय काढला आहे. या तिन्ही मुद्द्यांबाबत राज्य सरकारने कोणती पावले उचलावी याचा अभ्यास करून समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यातील साखर उद्योगापुढील समस्या संदर्भात दि. २४ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, नाबार्डचे प्रतिनिधी, वित्त, सहकार, कृषी या विभागाचे अतिरिक्त सचिव व प्रधान सचिव, आयुक्त उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

शासन निर्णयात काय म्हटले ?

शासन निर्णयात म्हटले आहे कि, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योग प्रश्नासंदर्भात दि. २४/०३/२०२६ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासमोर असणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीने राज्यातील साखर उद्योगासमोर असलेल्या विविध अडचणी आणि गाळप हंगाम २०२६-२०२७ सुरु करण्याकरीता करावयाच्या आवश्यक उपाययोजना यासंदर्भात साखर कारखान्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य साखर संघाने केलेल्या मागण्यांबाबत विचार करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असून या समितीची रचना खालील प्रमाणे असेलः मुख्य सचिव – अध्यक्ष, सदस्य – अपर मुख्य सचिव, (वित्त), अपर मुख्य सचिव, (कृषि), अपर मुख्य सचिव, (उर्जा), प्रधान सचिव (उद्योग), प्रधान सचिव, (सहकार व पणन), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक, सहकार आयुक्त, पुणे आणि सदस्य सचिव- साखर आयुक्त

या समितीने राज्यातील साखर उद्योगासमोर असणाऱ्या विविध अडचणी, समस्यांचे स्वरूप, त्याच्या निराकरणाचे उपाय, पर्यायी व्यवस्था याबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here