महाराष्ट्र : राज्य सरकारच्या महाअॅग्री एआय धोरणामुळे ऊस शेतीला मिळाले बळ, शेतकऱ्यांना होतोय फायदा

कोल्हापूर : ऊस पट्ट्यात प्रत्येक भौगोलिक क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना स्वीकारल्या जात आहेत. त्याला महाराष्ट्र शासनाच्या महाअॅग्री-एआय धोरणाची जोड मिळाली आहे. शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वतंत्र एआय धोरण जाहीर केले आहे. कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या मदतीने हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, रोग-किडींचे निदान, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य भागात करवीर, कागल आणि गडहिंग्लज परिसरात ऊस, सोयाबीन, भाजीपाला आणि चारा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पूर्वेकडील शिरोळ आणि हातकणंगले परिसरात सिंचनाच्या आधारे ऊस, मका, भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय विकसित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक भागासाठी स्वतंत्र तांत्रिक उपाययोजना आवश्यक आहेत. आगामी काळात रासायनिक खतांवर किंवा जास्त उत्पादनावर आधारित न राहता शाश्वत शेतीला सेंद्रिय शेतीची जोड द्यावी लागणार आहे. याला एआय, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळू शकेल.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्ह्यातील भविष्यातील शेती ही विज्ञान, तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा समतोल साधणारी असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि पुनरुत्पादक शेतीच्या एकत्रित वापरातून अधिक उत्पादन, कमी खर्च, निरोगी माती आणि पर्यावरणपूरक शेती शक्य होईल. अलिकडील काळात मोबाईलद्वारे पिकांचे फोटो काढताच रोग किंवा किडीची ओळख पटविणे, हवामानाचा अंदाज, सिंचनाचे योग्य नियोजन, खतांच्या अचूक शिफारशी, उत्पादनाचा अंदाज आणि बाजारभावाचे विश्लेषण ही कामे एआयच्या साहाय्याने सहज शक्य होत आहेत.

ड्रोनद्वारे फवारणी, उपग्रहाद्वारे पिकांचे निरीक्षण, मृदा आर्द्रता मोजणारे सेन्सर्स, जीपीएस आधारित यंत्रसामग्री, स्वयंचलित ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनमुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर होईल. त्याचबरोबर विशेषतः ऊस पिकामध्ये ड्रोन, सेन्सर्स आणि अचूक सिंचन तंत्रज्ञानामुळे पाणी आणि खतांची २० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. शेतकरी आता या तंत्रज्ञानाकडे वळू लागले आहेत. त्याला पिक विविधीकरणाची जोड देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here