महाराष्ट्र : राज्य साखर संघाचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोधाचा ठराव

सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता राज्यातील सहकार क्षेत्रातून बळ मिळाले आहे. राज्य साखर संघाने या महामार्गाला जाहीर विरोध करत अधिकृत ठराव मंजूर केला आहे. या ठरावाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, मुंबईत २३ संचालकांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर झाला. ठरावाची प्रत कुरळप येथे शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे अॅड. विजय पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

मागील महिन्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, शहाजी पाटील, व्ही. टी. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी पी. आर. पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या वतीने महामार्गाविरोधात ठराव देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी, सहा दिवसांत साखर संघाची बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ, असा शब्द पी. आर. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी मुंबईत बैठक बोलावली आणि हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून घेतला.

ChiniMandi WhatsApp Channel

शक्तिपीठमुळे सुपीक शेती नष्ट होणार आहे. याचा फटका ऊसउत्पादकांना बसेल. सहकारी साखर उद्योग, कारखानदारी धोक्यात येईल. म्हणूनच साखर संघाने पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे, असे राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here