महाराष्ट्र : साखरेच्या एमएसपी दरवाढीसाठी कारखानदारांचे अमित शहा यांना साकडे, ४० रुपये दराची मागणी

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांना साखर विक्री व ऊस खरेदी या प्रक्रियेत प्रतिकिलो ९ रुपयांचा साखर कारखान्यांना फटका बसत आहे. साखर कारखानदार शासन आदेशानुसार एफआरपी देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना थेट शेतकऱ्यांना प्रतिटन ३४०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हा खर्च साधारणतः ४,००० रुपयांपर्यंत येतो. म्हणजेच उसाला ४० रुपये आणि साखर विक्री (एमएसपी) ३१ रुपये अशी स्थिती आहे. ही तूट कशी भरून काढायची, याचे उत्तर कोणीही देत नाही. साखरेचा दर आणि उसाची देय एफआरपी यात ९०० रुपयांची तफावत आल्याने कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी राज्यातील साखर कारखानदारांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे.

नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी व्यापक बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील विविध मंत्री व साखर कारखानदार उपस्थित होते. यावेळी साखरेचा प्रतिकिलो दर ३१ रुपयांवरून ४० रुपये करावा व इथेनॉलचा प्रतिलिटर दर ६० रुपयांवरून ६५ रुपये करावा, या दोन प्रमुख मागण्या बैठकीत करण्यात आल्या. यावर सहकारमंत्री अमित शहा यांनी साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मान्य केले. कारखान्यांचा इथेनॉल कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील दोन महिन्यांत त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनाबाबत आणि थकीत कर्जावरील व्याज सवलतीबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे केंद्रीय मंत्री शहा यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, साखर कारखान्यांच्या सद्यस्थितीविषयी बोलताना सोलापूरमधील साखर कारखानदार सचिन जाधव यांनी सांगितले की, काही कारखान्यांच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे शेतकऱ्यांची बिले थकतात. पण आज राज्यातील साखर कारखानदार अडचणीत आहेत. केंद्र सरकारकडून एमएसपीच्या दरात वाढ करणे हा एकमेव पर्याय असून, एमएसपी वाढली तरच आर्थिक कोंडी दूर होऊ शकते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here