महाराष्ट्र : देशात साखरेच्या दुहेरी किमतीचे धोरण राबविण्याची कारखानदारांची मागणी

कोल्हापूर : देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ६० ते ६५ टक्के साखरेचा वापर हा व्यावसायिक कारणांसाठी होतो. उर्वरित ३५ टक्के साखरच घरगुती कारणांसाठी वापरली जाते. त्यामुळे साखर ही जीवनावश्यक वस्तू कायद्यातून काढली तरी सर्वसामान्यांवर काही परिणाम होणार नाही. तरीही महागाई वाढते, अशी ओरड होत असेल तर व्यावसायिक कारणांसाठी जादा दराने साखर विक्रीचे धोरण करण्याची गरज आहे. दुहेरी किमतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी कारखान्यांची उत्पादीत साखर सरकारने खरेदी करून व्यावसायिकांना ती जादा दराने द्यावी, हा पर्याय होऊ शकतो असे मत साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. साखरेचा दर वाढला की बाजारात महागाई वाढल्याचा संकेत जातो. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसली, अशी ओरड होते. यावर उपाय म्हणून साखरेच्या दुहेरी किमतीचे धोरण तरी आणावे, त्यातून काही रक्कम कारखान्यांना मिळेल. यावर गांभीर्याने विचार करण्याची मागणी साखर उद्योगाने केली आहे.

साखर कारखानदारांच्या मते, गेल्या सात वर्षांत उसाच्या एफआरपीत प्रतिटन तब्बल ९०० रुपयांची वाढ झाली. पण, या काळात साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयेच आहे. एफआरपीत वाढ होत असताना स्थिर साखर दरामुळे कारखान्यांचा ताळमेळच जमेना अशी स्थिती आहे. परिणामी एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत. हंगाम २०१८-१९ मध्ये उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये होती, यावर्षीच्या हंगामासाठी ती ३६५० रुपये केली. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. यावर उपाय म्हणून कारखान्यांवरील सर्व कर्जाचे १२ वर्षांसाठी पुनर्गठण करणे, या कर्जावरील ५० टक्के व्याज राज्य शासनाने द्यावे, थकीत एफआरपी देण्यासाठी बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देण्याचे आदेश द्यावेत, एफआरपीची पूर्तता होईपर्यंत ती न दिल्याबद्दल कारखान्यांवर कारवाई होऊ नये, कारखान्यांच्या सर्व अल्प मुदतीची कर्जे दीर्घ मुदतीची करण्याबाबत बँकांना निर्देश द्यावेत, सहवीज प्रकल्पातील विजेला प्रतियुनिट १.५० रुपये दिली जाणारी सबसिडी पुन्हा सुरू करावी आणि पंजाबच्या धर्तीवर उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये सबसिडी द्या, अशी मागणी केली जात आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here