सांगली : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदाचा २०२६-२७ ऊस गळीत हंगाम नेमका कधी सुरू करायचा, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे. साखर कारखान्यांना परवान्यासाठी अर्जप्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्य सरकारने कारखान्यांना गाळप परवाना देण्याचे नियम कडक केले आहेत. मागील हंगामातील उसाची शंभर टक्के रास्त व किफायतशीर दराची रक्कम (एफआरपी) अदा केल्याशिवाय गाळप परवाना मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, साखर उद्योगासमोरील इतर अडचणी पाहता हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदाच्या साखर उत्पादनावर परिणामाची शक्यता आहे.
साखर आयुक्तालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदा साखर उत्पादनात सुमारे दोन लाख टनांची घट होऊ शकते. साखर उद्योगासमोर ऊस तोडणी मजुरांची उपलब्धता, दसरा-दिवाळीचे सण आणि त्याच काळात परतीच्या पावसाची शक्यता अशा अडचणी आहेत. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई केली जाणार आहे. साखरेचा दर सध्या ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असून, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात यंदा प्राथमिक अंदाजानुसार १ लाख २३ हजार ५५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. ऊस मिळविण्यासाठी १६ कारखान्यांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. यापैकी ३ कारखान्यांसमोर यंदा ऊस उपलब्धतेबरोबरच एफआरपीची पूर्तता आणि गाळप परवाना मिळविण्याचे आव्हान आहे.


















