महाराष्ट्र : ऊसतोड कामगारांचा साखर संघासोबतचा करार संपला, आता शंभर टक्के दरवाढीची मागणी

बीड : महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांबरोबर दर तीन वर्षांनी ऊस तोडणीविषयक करार केला जातो. या करारात मंजूर करण्यात आलेला दर पुढील तीन वर्षासाठी कायम राहतो. तीन वर्षांचा हा करार आता संपला आहे. यंदा वाढलेली महागाई, इंधन वाढ आणि सर्वात प्रमुख म्हणजे राज्यभर पाहायला मिळणारा दुष्काळ यामुळे कोणत्याही परिस्थितीत दरवाढ झालीच पाहिजे या पवित्र्यात ऊसतोड कामगार संघटना आहेत.ऊसतोड कामगार संघटनांनी पुन्हा एकदा शंभर टक्के दरवाढीची मागणी साखर संघाकडे केली आहे. ऊसतोड कामगारांना शंभर टक्के दर वाढ आणि मुकादमांना ३० टक्के कमिशन हवे आहे. या मागणीसाठी आता राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याच अनुषंगाने १० ऑक्टोबर रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे साखर परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून साखर संघ आणि कारखान्यांवर दबाव तंत्र टाकले जाऊ शकते.

दरम्यान, बीड जिल्ह्यात ऊसतोड नेत्यांचे दोन प्रवाह पाहायला मिळतात. मंत्री पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या संघटना दर निश्चित झाल्याशिवाय जिल्ह्यातून बाहेर पडायचे नाही या भूमिकेत आहेत. तर आमदार सुरेश धस यांनी नुकताच वडवणी येथे ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना धस यांनी कारखान्यावर जाऊन आंदोलन करायचे असे जाहीर केले. आमदार धस यांनी सांगितले की, यावर्षी ऊसतोड कामगार कारखान्यावर गेल्यानंतर पंधरा दिवसांनी बेमुदत संप पुकारणार आहोत. तोपर्यंत साखर संघाने आमच्याशी तातडीने बोलणी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची धुराडी बंद करणार म्हणजे करणारच. मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये एकाचवेळी संप पुकारणार आहोत. मात्र, ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी वाढीच्या मागणीवर अद्याप साखर संघाकडून कोणतीही हालचाल सुरु करण्यात आली नाही, असे सांगण्यात येते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here