महाराष्ट्र : ऊसदर आंदोलन चिघळले; ३ नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले ऊसदर आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येत्या ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात ऊसदराचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने ‘छावणी’ आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची व्याप्ती आता कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातही वाढली आहे. विविध ठिकाणी साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात येत असून, आंदोलनामुळे ऊसतोडणी आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

शुक्रवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी झालेली ही बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांवर आणि साखर कारखानदारांच्या भूमिकेवर एकमत होऊ न शकल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असताना काही ठिकाणी तणावपूर्ण घटना घडल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडविण्यात आली असून, काही ठिकाणी ऊस वाहतुकीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर उलटविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस वाहतूक रोखली जात असल्याने साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, यासाठी संघटनेने प्रतिटन ५ हजार रुपयांची मागणी लावून धरली आहे. राजू शेट्टी यांनी ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ‘छावणी’ आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत साखर कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात पुन्हा चर्चा होणार का आणि ऊसदराचा तिढा सुटणार का, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here