महाराष्ट्र : ऊस गाळप हंगामासोबत वजनकाट्यांची होणार अचानक तपासणी; जिल्हानिहाय भरारी पथके

कोल्हापूर : राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दुष्काळाची परिस्थिती, तसेच साखर आणि उसाची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हंगाम सुरू होत असतानाच साखर कारखान्यांवरील ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथके स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आवश्यक सूचना दिल्या आहेत.

तक्रार मिळताच वजनकाट्यांची तातडीने तपासणी

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस वजनाबाबत शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान वजनामध्ये गैरप्रकार किंवा अन्य बेकायदेशीर बाबी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वजनकाट्यांच्या तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी

भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने साखर कारखान्यांना अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना ऊस वजनाची पावती योग्य पद्धतीने दिली जाते की नाही, याचीही खातरजमा पथकांकडून केली जाणार आहे. ऊस वजनामध्ये गैरप्रकार होऊ नयेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या वजनाची अचूक व योग्य पावती मिळावी, हा या तपासणीमागील प्रमुख उद्देश आहे.

कारखान्यांच्या संख्येनुसार पथकांची स्थापना

प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांच्या संख्येनुसार तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकांमध्ये विविध विभागांतील अधिकाऱ्यांसह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश केला जाणार आहे. यामध्ये,महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस विभागाचे प्रतिनिधी, वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी, माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहनांची व्यवस्था

भरारी पथकांना तपासणीसाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था जिल्हाधिकारी स्तरावरून करण्याच्या सूचनाही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच वजनकाट्यांवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात पारदर्शकता राहावी, तसेच वजनाबाबत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here