महाराष्ट्र : गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर : राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत उसाची थकीत बिले, राज्यातील उसाची एकूण उपलब्धता याचा आढावा घेण्यात येईल. याच बैठकीत गाळप हंगामाची तारीख निश्चित केली जाणार आहे. ‘चीनीमंडी’ला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार १ नोव्हेंबर २०२३ पासून गाळप हंगाम सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

साखर हंगाम सुरु करण्याबाबत दोन भिन्न मतप्रवाह

राज्यात साखर हंगाम सुरु करण्याबाबत दोन भिन्न मतप्रवाह आहेत. काहींच्या मते उसाचे घटलेले उत्पादन आणि चाऱ्यासाठी होत असलेला वापर बघता गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरु करण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे लवकर हंगाम सुरु केल्यास उसाला योग्य उतारा मिळणार नाही आणि त्यातून शेतकरी व कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरु करावा, असा मतप्रवाह होता. राज्यातील पावसाची स्थिती, उसाचे संभाव्य उत्पादन आणि शेजारील कर्नाटक राज्याचा गाळप हंगाम याचा सांगोपांग विचार करून राज्य सरकार १ नोव्हेंबर २०२३ पासून हंगाम सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते.

पावसाअभावी राज्यातील ऊस उत्पादनावर परिणाम…

पावसाअभावी राज्यातील ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाअभावी उसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढविलेली क्षमता यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम कसाबसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते आणि 2022-23 हंगामात राज्यातील कारखान्यांनी 10.5 दशलक्ष टन उत्पादन केले होते. मात्र यंदा ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

WISMA ची 15 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करण्याची मागणी

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने साखर कारखान्यांना उसाचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता गृहीत धरून 15 ऑक्टोबरपासून गळीत हगाम सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. WISMA ने म्हटले आहे कि, यंदा उत्पादनात 15 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवत आहेत. जर राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारू शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून गळीत हगाम सुरू करण्याची मागणी WISMA ने केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू करणे सोयीस्कर…

कर्नाटक सरकारने यंदा एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी गळीत हंगाम १५ ऑक्टोबरच्या आसपास सुरू होतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. गतहंगामापेक्षा उसाची उपलब्धता १५ ते २० टक्क्यांनी कमी आहे. पाऊस कमी असल्याने उसाची वाढ म्हणावी तशी झालेली नाही, ऊस चांगला वाढला तरच वजन आणि उतारा चांगला मिळतो. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊसही कारखान्यांत येईल. परिणामी शेतकऱ्यांचे, उतारा कमी आल्याने कारखान्यांचेही नुकसान होईल. १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू झाल्यास ऊसतोड मजुरांची टंचाईही जाणवणार नाही, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडून या दोन्हीचा सुवर्णमध्य साधला जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here