महाराष्ट्र : २०२६-२७ गाळप हंगामापूर्वी ‘विस्मा’च्या सरकारकडे प्रमुख मागण्या; प्रतिटन ७५० रुपयांच्या आर्थिक मदतीच्या मागणीचाही समावेश

पुणे : महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने केली आहे. २०२६-२७ चा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे. ‘विस्मा’ चे अध्यक्ष बी.बी.ठोबरे यांनी मुंबईत ९ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीपूर्वी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. ऊस उपलब्धता, लवकर गाळप, वाढता उत्पादन खर्च आणि शासनाकडून प्रलंबित असलेली देणी यासह विविध मुद्दे संघटनेने मांडले आहेत.

कमी पावसामुळे ऊस उपलब्धतेवर परिणाम

ChiniMandi WhatsApp Channel

‘विस्मा’च्या म्हणण्यानुसार, २०२५-२६ हंगामात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने सुमारे १४ लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस लागवडीला फायदा झाला. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.नवीन ऊस लागवडीत घट झाली असून उभ्या उसामध्ये खोडव्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे आगामी हंगामात ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता ‘विस्मा’ने व्यक्त केली आहे.राज्यातील साखर कारखान्यांची एकत्रित दैनिक गाळप क्षमता सुमारे १०.४ लाख टन आहे. ऊस उपलब्धता कमी असताना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास प्रभावी गाळप कालावधी १०० दिवसांपेक्षा कमी राहू शकतो. परिणामी कारखान्यांवरील आर्थिक दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अपरिपक्व उसाच्या गाळपामुळे रिकव्हरी घटण्याची शक्यता

पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी ऊस गाळप करण्याबाबत ‘विस्मा’ने विशेष चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे ऊस नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत परिपक्व होतो. मात्र, सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.‘विस्मा’च्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान अपरिपक्व उसाचे गाळप केल्यास साखर उताऱ्यात सुमारे १ ते १.५ टक्क्यांची घट होऊ शकते. त्यामुळे कारखान्यांना प्रतिटन ४५० ते ५०० रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे.

अपरिपक्व उसाचे वजनही सामान्य उसाच्या तुलनेत सुमारे १० ते १२ टक्क्यांनी कमी राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० ते ३५० रुपयांचे नुकसान होऊ शकते.अशा प्रकारे कारखाने आणि शेतकरी मिळून होणारा एकत्रित तोटा प्रतिटन ७५० ते ८०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे १५ नोव्हेंबरपूर्वी गाळप करण्यात येणाऱ्या प्रत्येक टन उसासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून प्रतिटन ७५० रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.

साखरेचे घटते दर आणि वाढता उत्पादन खर्च

साखरेच्या घटत्या किमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळेही कारखान्यांवर दबाव वाढत असल्याचे ‘विस्मा’ने म्हटले आहे.ऑगस्टच्या सुरुवातीला काही काळ वाढल्यानंतर, सरकारी उपाययोजना आणि १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याच्या निर्णयानंतर कारखाना पातळीवरील साखरेचे दर घसरून सुमारे ४,४०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.त्याचवेळी, १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी द्यावी लागत आहे. याशिवाय ऊसतोड कामगार संघटनांनी मजुरीत ८० टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनांकडूनही उसाला अधिक दर देण्याची मागणी होत आहे.

खासगी आणि सहकारी कारखान्यांना समान वागणूक देण्याची मागणी

महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना समान आर्थिक आणि धोरणात्मक मदत मिळावी, अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.केंद्र सरकार दोन्ही क्षेत्रांसाठी समान धोरण अवलंबते; मात्र राज्य पातळीवर खासगी कारखान्यांना सहकारी कारखान्यांप्रमाणे आर्थिक मदत उपलब्ध होत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. सॉफ्ट लोन २०१५ योजनेअंतर्गत २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षांसाठी २७ खासगी साखर कारखान्यांची ४९२ कोटी रुपयांची प्रलंबित व्याज अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्य सरकारने ३१ मार्च २०१९ रोजीच्या आदेशानुसार सहकारी कारखान्यांना आश्वासनानुसार मदत वितरित केली होती. मात्र खासगी कारखान्यांना देय असलेली रक्कम अद्याप मिळालेली नाही.

२०१०-११ च्या अतिरिक्त ऊस गाळपाचे ८.४५ कोटी रुपये प्रलंबित

२०१०-११ च्या अतिरिक्त ऊस हंगामात झालेल्या वाहतूक खर्च आणि साखर उताऱ्यातील नुकसानीपोटी आठ खासगी साखर कारखान्यांना ८.४५ कोटी रुपये देण्यात यावेत, अशीही मागणी ‘विस्मा’ने केली आहे.सरकारी निर्देशांनुसार या कारखान्यांनी त्यांच्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेरील अतिरिक्त उसाचे गाळप केले होते. तसेच हंगामाच्या शेवटपर्यंत कारखाने सुरू ठेवले होते. ‘विस्मा’च्या म्हणण्यानुसार, बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय क्रमांक १६०२/२०१४ द्वारे संबंधित खर्चाची परतफेड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दशकाहून अधिक काळ उलटूनही ही रक्कम अद्याप प्रलंबित आहे.

नवीन गाळप हंगामापूर्वी प्रश्न सोडवण्याची मागणी

नवीन गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी या सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन ‘विस्मा’ने राज्य सरकारला केले आहे.खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत, अनुदान आणि सरकारी धोरणांचा समान लाभ मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.लवकर गाळपामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भरपाई, प्रलंबित अनुदाने व देणी तातडीने अदा करणे आणि खासगी कारखान्यांना सहकारी कारखान्यांप्रमाणेच मदत उपलब्ध करून देणे, या उपाययोजनांमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगावरील आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

Bioenergy Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here