माळेगाव कारखान्याने प्रतिटन ४०३९ रुपये भाव जाहीर करावा; डिस्टिलरी प्रकरणाची चौकशी करावी : कष्टकरी शेतकरी समितीची मागणी

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन ४०३९ रुपयांचा भाव जाहीर करावा, तसेच डिस्टिलरी प्रकरणाबाबत तत्काळ लेखी खुलासा करावा, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे. याशिवाय मागील तीन वर्षांत कारखान्यासाठी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीची चौकशी करून त्याची गुणवत्ता, तसेच गॅरंटी आणि वॉरंटीचा सविस्तर तपशील सभासदांसमोर जाहीर करावा, अशीही मागणी समितीने केली.

या विविध मागण्यांसाठी कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने सोमवारी (दि. २१) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे कारखाना प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत समितीने आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

ChiniMandi WhatsApp Channel

डिस्टिलरी प्रकरणावर लेखी खुलाशाची मागणी

डिस्टिलरी प्रकरणाबाबत कारखाना प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून लेखी खुलासा करावा, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच मागील तीन वर्षांत कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या विविध साहित्याची माहिती सभासदांना उपलब्ध करून द्यावी. या साहित्याची गुणवत्ता, खरेदी प्रक्रिया आणि संबंधित साहित्याला असलेली गॅरंटी-वॉरंटी याचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.

‘४०३९ रुपये भाव जाहीर करा’

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून माळेगाव कारखान्याने प्रतिटन ४०३९ रुपयांचा ऊसदर जाहीर करावा, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असावी आणि सभासदांना कारखान्याच्या निर्णयांची तसेच आर्थिक व्यवहारांची स्पष्ट माहिती मिळावी, अशी भूमिका समितीने मांडली. दरम्यान, कारखाना प्रशासनाच्या वतीने समितीचे निवेदन स्वीकारण्यात आले. मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेतकरी सभासदांचा मोठा सहभाग

आंदोलनात दशरथ राऊत, अमित जगताप, अरविंद बनसोडे, पोपटराव निगडे, भारत देवकाते, शैलेश दंडवते, सतीश जगताप, बाळासाहेब घुटे, संतोष आगरवाल, सुखदेव जाधव, पोपटराव कोरे, आबासाहेब देवकाते, दिग्विजय कोकरे, सोपानराव देवकाते, इंद्रसेन आटोळे यांच्यासह अनेक शेतकरी सभासद सहभागी झाले होते. ऊसदर, डिस्टिलरी प्रकरण आणि साहित्य खरेदीतील पारदर्शकता या मुद्द्यांवर समितीने आंदोलनाची भूमिका घेतल्याने माळेगाव कारखान्याच्या आगामी निर्णयांकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here